BNS Section-18 कायदेशीर काम करताना अपघात

हे कलम जुन्या भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ८० (Section 80) सारखेच आहे.

थोडक्यात सांगायचे तर, जर एखादी व्यक्ती कायदेशीर काम पूर्ण काळजी घेऊन करत असेल आणि तरीही एखादी दुर्घटना किंवा अपघात घडला, तर त्याला गुन्हा मानला जात नाही.

“कायदेशीर कृत्य, कायदेशीर पद्धतीने, कायदेशीर साधनांनी आणि योग्य काळजी व खबरदारी घेऊन करताना, जर अपघात किंवा दुर्दैवाने एखादी घटना घडली, तर तो गुन्हा ठरत नाही; बशर्ते त्यामध्ये कोणताही गुन्हेगारी हेतू (Criminal Intention) किंवा ज्ञान नसावे.”

या कलमांतर्गत कायदेशीर संरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी खालील बाबी सिद्ध होणे गरजेचे आहे:

१. अपघात किंवा दुर्दैव: घडलेली घटना पूर्णपणे अनपेक्षित आणि अपघाती असावी.

२. गुन्हेगारी हेतू नसणे: ती कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा कोणालाही इजा करण्याचा किंवा गुन्हा करण्याचा हेतू नसावा.

३. कायदेशीर कृत्य: जे काम केले जात होते ते कायद्यानुसार वैध असावे (बेकायदेशीर कामाला हा नियम लागू होत नाही).

४. योग्य काळजी आणि खबरदारी: कृत्य करताना व्यक्तीने योग्य ती सर्व काळजी घेतलेली असावी (निष्काळजीपणा नसावा).

  • कुऱ्हाडीचे उदाहरण: ‘A’ नावाचा एक माणूस कुऱ्हाडीने लाकूड तोडत आहे. काम करत असताना अचानक कुऱ्हाडीचे लोखंडी धड (पाते) निखळते आणि बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीला लागते, ज्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. येथे जर ‘A’ च्या बाजूने कोणतीही निष्काळजीपणाची कमतरता नसेल (म्हणजे त्याने सर्व काळजी घेतली असेल), तर त्याचा हा कायदा पूर्णपणे क्षम्य आहे आणि तो गुन्हा मानला जाणार नाही.
  • वाहतुकीचा अपघात: समजा ‘अमोल’ हा सर्व ट्रॅफिक नियमांचे पालन करून, वेगमर्यादेत आणि काळजीपूर्वक गाडी चालवत आहे. अचानक एक लहान मुलगा धावत रस्त्यावर येतो. अमोलने ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, तरीही गाडी त्या मुलाला धडकते आणि मुलाला दुखापत होते. येथे अमोलचा कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता आणि तो काळजीपूर्वक गाडी चालवत असल्यामुळे, कलम १८ अंतर्गत त्याचे हे कृत्य गुन्हा मानले जाणार नाही.
  • क्रिकेटचा खेळ: मैदानावर दोन मित्र क्रिकेट खेळत आहेत. एकाने मारलेला शॉट चुकून दुसऱ्या मित्राच्या डोक्याला लागतो आणि तो गंभीर जखमी होतो. खेळ खेळणे ही कायदेशीर बाब आहे आणि खेळाडूंनी आवश्यक ती काळजी घेतली असल्यास, या अपघाताला गुन्हा मानले जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *