BNS Section-23 इच्छेविरुद्ध नशेत केलेले कृत्य

हे कलम जुन्या भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ८५ (Section 85) सारखेच आहे.

या कलमानुसार, जर एखाद्या व्यक्तीला तिच्या नकळत, फसवून किंवा बळजबरीने नशा दिली गेली आणि त्या नशेच्या भरात तिच्याकडून एखादे कृत्य घडले, तर त्याला गुन्हा मानला जात नाही.

“कोणतीही गोष्ट गुन्‍ह ठरत नाही, जी अशी व्यक्‍ती करते जिने ते कृत्य करताना, नशेमुळे (Intoxication) कृत्याचे स्वरूप काय आहे किंवा आपण जे करत आहोत ते चुकीचे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे, हे समजण्यास ती असमर्थ असते; बशर्ते ज्या पदार्थामुळे तिला नशा झाली होती, तो पदार्थ तिला तिच्या माहितीशिवाय किंवा इच्छेविरुद्ध देण्यात आलेला असावा.”

या कलमांतर्गत कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयासमोर खालील ३ गोष्टी सिद्ध कराव्या लागतात:

१. पूर्ण नशा (State of Intoxication): कृत्य करताना व्यक्ती इतकी जास्त नशेमध्ये असावी की तिला स्वतःच्या कृत्याचे स्वरूप किंवा त्याचे काय परिणाम होतील, हे समजण्याची शुद्ध नसावी.

२. इच्छेविरुद्ध किंवा नकळत नशा: सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, ती नशा त्या व्यक्तीने स्वतःच्या आवडीने किंवा इच्छेने केलेली नसावी. ती नशा कोणा दुसऱ्याने तिला फसवून, औषधात/खाण्यात मिसळून किंवा जबरदस्तीने केलेली असावी.

३. गुन्हा घडतानाची स्थिती: ही नशा आणि शुद्ध हरपण्याची स्थिती नेमकी ‘गुन्हा घडत असलेल्या क्षणी’ असणे अनिवार्य आहे.

  • उदाहरण १ (कायदेशीर संरक्षण मिळणारे): ‘राहुल’ एका पार्टीत गेला आहे. तिथे त्याच्या एका हितशत्रूने राहुलच्या कोल्ड्रिंकमध्ये गुपचूप एक तीव्र अमली पदार्थ (Drug) मिसळला, ज्याची राहुलला अजिबात कल्पना नव्हती. ते प्यायल्यानंतर राहुलची शुद्ध पूर्णपणे हरपली आणि नशेच्या भरात त्याने समोरच्या व्यक्तीवर हल्ला केला. या प्रकरणात राहुलला कलम २३ चे संरक्षण मिळेल, कारण नशा त्याच्या माहितीशिवाय आणि इच्छेविरुद्ध दिली गेली होती.
  • उदाहरण २ (संरक्षण न मिळणारे – स्वतःहून केलेली नशा): ‘विकास’ स्वतःच्या पैशाने दारू विकत घेतो आणि भरपूर मद्यपान करतो. दारूच्या नशेत तो रस्त्यावर जाऊन गोंधळ घालतो आणि एका दुकानदाराला मारहाण करतो. न्यायालयात विकास “मी नशेत होतो, मला समजले नाही” असा बचाव घेऊ शकत नाही. कारण ही नशा त्याने स्वतःच्या इच्छेने केली होती. स्वतःहून केलेल्या नशेसाठी BNS चे कलम २४ लागू होते, ज्यामध्ये शिक्षा होऊ शकते.

कायदा मानतो की गुन्ह्यासाठी ‘गुन्हेगारी हेतू’ (Mens Rea) असणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला फसवून नशा दिली गेली असेल, तर तिची विचार करण्याची क्षमता नष्ट होते आणि तिचा कृत्य करण्यामागे स्वतःचा कोणताही हेतू उरत नाही. म्हणून कायद्याने अशा व्यक्तीला निष्पाप मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *